विभागातील वॉररूममुळे आठवडाभरात खाटांच्या तक्रारी कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:43 AM2020-06-11T02:43:00+5:302020-06-11T02:43:19+5:30
१९१६ ही हेल्पलाइन अनेक वेळा लागत नाही, सतत व्यस्त असते. नेमकी समस्या काय?
कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी एक लाख खाटांची व्यवस्था असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन करीत असते. मात्र रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावतात. रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत, हेल्पलाइन क्रमांकावर प्रतिसाद मिळत नाही, अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी विचारलेल्या 'थेट सवाल' दरम्यान दिली.
कोरोनाबाबत मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे?
मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले तरी रुग्णवाढीची संख्या नियंत्रणात आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा राष्ट्रीय दर १६ दिवसांचा आहे, मुंबईत मात्र २४.५ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. आतापर्यंत ५० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २५ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोणतीही लक्षणे नसलेले १३ हजार रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. उर्वरित रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या रुग्णालयात किती रुग्ण उपचार घेत आहेत? त्यांचे वर्गीकरण कसे करता? त्यांच्यासाठी किती खाटा राखीव आहेत?
सध्या १२ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. भारतात आढळलेला कोरोना मर्यादित शक्तीचा असल्याने ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे असे रुग्ण आठ ते दहा दिवसांत बरे होऊन घरी जातात. यामध्ये चार प्रकारचे रुग्ण आढळून येत आहेत. संशयित अथवा बाधित रुग्णाचे क्लोज कॉन्टॅक्ट आणि पॉझिटिव्ह मात्र लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर १, २ यामध्ये ठेवण्यात येते. या केंद्रांमध्ये ७५ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मध्यम स्वरूपाची लक्षणे अथवा श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी दहा हजार खाटा, तसेच तीव्र स्वरूपाची लक्षणे आणि इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. तेथे १५ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
खाटा मिळत नाहीत अशा लोकांच्या तक्रारी सातत्याने येत आहेत, त्याचे काय?
अशा तक्रारी येतात हे मान्य करावे लागेल. पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात १९१६ या हेल्पलाइनद्वारे खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका पाठवण्याची सुविधा देण्यात येते. मात्र या क्रमांकावर ताण वाढत असल्याने आता २४ प्रशासकीय विभागांमध्ये वॉररूम स्थापन करण्यात आले आहे. येथे दहा संपर्क क्रमांक असून २४ तास डॉक्टर उपलब्ध आहेत. सकाळी रुग्णांची यादी आल्यावर आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याला तपासतील, त्यानंतर नेमक्या कोणत्या रुग्णालयात दाखल करावे, हे ठरविण्यात येईल. या पद्धतीमुळे एका आठवड्यात खाटा न मिळण्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल. कोरोनाबाधित ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र लोकांमध्ये भीती असल्याने रुग्णालयात दखल करून घेण्याचा आग्रह अनेक वेळा धरला जातो.
१९१६ ही हेल्पलाइन अनेक वेळा लागत नाही, सतत व्यस्त असते. नेमकी समस्या काय?
१९१६ साठी ३० आॅपरेटर ठेवण्यात आले आहेत. मात्र तक्रारदारांच्या तुलनेत ही सेवा अपुरी पडत असल्याने अशी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागात स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. विभागाच्या लोकसंख्येनुसार हेल्पलाइन वाढविण्यात आली आहे. तसेच २४ तास ही सेवा सुरू
असल्याने यापुढे समस्या निर्माण होणार नाही.
रुग्णवाहिका बोलाविल्यानंतर वेळेवर येत नाहीत, अशीही एक तक्रार आहे. यावर काय तोडगा काढला?
ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक विभागात १५ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. विभागात यापुढे संपर्क केल्यास रुग्णवाहिका तत्काळ रुग्णापर्यंत पोहोचेल. संपर्क केल्यानंतर १५ मिनिटांत रुग्णाच्या दारात रुग्णवाहिका पोहोचेल, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यापुढे अशी तक्रार येणार नाही, असा विश्वास वाटतो.