आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:24+5:302021-07-09T04:06:24+5:30
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी रायगड येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. महाराजांच्या ...
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी रायगड येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. महाराजांच्या राजोपचार पूजेसाठी गजशाळा, अश्वशाळा, गोशाळा, राजमंदिर व तुलसी वृंदावन येथील पावन मृत्तिका आणि एकवीस गंगांचे पवित्र जल गडावर आणले गेले होते. महाराजांच्या पादुकांवर षोडषोपचाराने रुद्राभिषेक झाल्यानंतर, श्रीवाडेश्वर महादेव व शिर्काई देवीची महापूजा बांधून महाराजांच्या पादुका गड उतरल्या. आणि महाराजांच्या पादुकांना निरोप द्यायला आलेल्या रायगडावरील औकीरकरांचे डोळे विरहाने भारावून अक्षरशः पाणावले.
पाचाडमधील मातोश्री जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी पूजा बांधून मुजरे झडल्यानंतर सोहळ्यास निरोपाचे विडे दिले गेले. नंतर शिवरायांचा सोहळा पंढरीच्या दिशेने प्रतीकात्मक चाल करुन पुनाडे गावातील मारुती मंदिरात पहिल्या विसाव्यासाठी दाखल झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ पाचच शिवभक्त राज्याभिषेकापासून रायगड चरणांशी विसावलेल्या महाराजांच्या पादुका घेऊन, प्रस्थान महापूजा करुन नाणे दरवाजाने हिरकणीवाडी, पाचाड मार्गे अनंत देशमुख यांच्याकडे प्रस्थान महाप्रसाद घेऊन जिजाऊंच्या समाधी दर्शनास गेले. महाराजांच्या पादुका पंढरपुरी, आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विठ्ठलाच्या पायांशी आपली वारी पोहचवतील. वारी पूर्ण झाल्यानंतर २३ जुलैला पुन्हा रायगडी येऊन वारी पूर्ण केली की पुढील वर्षभराच्या निवासासाठी या पादुका परत शिवनेरीवर जातात. महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ७ वे वर्ष आहे.
दरम्यान, प्रस्थान महापूजा झाल्यानंतर महाराजांच्या समाधी मेघडंबरीपासून पादुका पंढरीस घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी सुधीर इंगवले, साहिल शेख, अजित शिंदे, कार्तिक भंडारे, पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली आहे. स्थानिक स्तरावर श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, अनंत देशमुख, मनोहर औकीरकर, यशवंत औकीरकर यांनी सहयोगाने साऱ्या व्यवस्था पाहिल्या. पोलीस निरीक्षक नीलेश गवारी, उपनिरीक्षक दिनेश आघाव, गोपनीयचे प्रशांत मोरे यांनी बंदोबस्त ठेवला होता.