मुंबई : मार्वे चौपाटीवर रविवारी घडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर जीवरक्षक तैनात करण्यात यावेत, तसेच दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.
अस्लम शेख पुढे म्हणाले की, जीवरक्षक, झाडांची छाटणी अशा विविध कारणांसाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करते. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. कधीतरी महानगरपालिका त्यांची ही जबाबदारी स्वीकारणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १६ जुलै रोजी घडली होती. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह सोमवारी दुपारपर्यंत सापडले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी जीवरक्षक तैनात करण्याची आग्रही मागणी अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.