गणेश मंडळांसाठी अनामत रक्कम १०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:15 PM2023-08-02T13:15:17+5:302023-08-02T13:15:47+5:30
...याशिवाय यंदा गणेश विसर्जन काळात मुंबई महापालिकेच्या वतीने प्रसाद देऊन गणेशभक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था यंदा महापालिकेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : यंदापासून गणेशोत्सव मंडळाकडून एक हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा मुंबई पालिका प्रशासनाचा निर्णय सोमवारी मागे घेण्यात आला. आता गणेशोत्सव मंडळांना १०० रुपये अनामत रक्कम पालिकेला द्यावी लागणार आहे. याशिवाय यंदा गणेश विसर्जन काळात मुंबई महापालिकेच्या वतीने प्रसाद देऊन गणेशभक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था यंदा महापालिकेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी पालिका मुख्यालयात मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पालिका प्रशासनाकडून हे निर्णय घेण्यात आले.
मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत असताना पालिका आरोग्य विभागाने त्यांच्यासोबत दिवस निश्चित करून व्यापक प्रमाणावर वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, गणेशोत्सवकाळात नियमितपणे स्वच्छता राखावी, विसर्जन मार्गाची देखभाल व दुरुस्ती करावी, अशा सूचनाही पालकमंत्री लोढा यांनी केल्या. पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन महापालिकेने निश्चित केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन केसरकर यांनी गणेशभक्तांना केले आहे. चायनीज गणेशमूर्तींवर सरसकट बंदी आणा, अशी मागणी शेलार यांनी केली.
विसर्जनासाठी पालिकेकडून ३०८ कृत्रिम तलाव
- यंदाच्या गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
- मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी ४५ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान ५ ते १० मूर्तिकार काम करू शकणार आहेत.
- पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला असून, आतापर्यंत पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना २०५ मेट्रिक टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय मूर्तिकारांसाठी अधिक माती उपलब्ध करून दिली जाईल.
असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, वृक्षछाटणी अशी कामेही सुरू असल्याची माहिती पालिका उपायुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली.