मुंबई : सुरुवातीला मुंबई विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयात असलेली ऐतिहासिक सहा हजार नाणी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेन्यायालय प्रशासनाला दिले. मात्र, या लॉकरचा खर्च मुंबई विद्यापीठाने भरावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुंबई कॉईन सोसायटीचे अध्यक्ष फारोख तोडीवाला यांनी मुंबई विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयातून मूळ ऐतिहासिक नाणी गायब झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी २०१४ मध्ये मुंबई विद्यापीठाविरोधात याचिका दाखल केली होती. तोडीवाला यांनी त्यांच्या नाणी संग्रहालयातील काही नाणी कमी किमतीत मुंबई विद्यापीठाला दिली. जेणेकरून विद्यापीठाला देणगी मिळावी.
विद्यापीठाला ऐतिहासिक नाणी सांभाळता न आल्याबद्दल उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात सुनावले होते. विद्यापीठाच्या उदासीन वृत्तीबाबत न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. विद्यापीठाच्या उदासीनतेमुळे पुरातन आणि ऐतिहासिक नाणी नष्ट झाली, असे न्यायालयाने म्हटले होते.
विद्यापीठाच्या नावावर तोडीवाला यांच्याकडून कमी किमतीत ऐतिहासिक नाणी विकत घेणाऱ्या वस्तुसंग्रहालयाला आतापर्यंत किती नाणी विकण्यात आली आणि किती नाण्यांचा लिलाव करण्यात आला, याची माहिती न्यायालयाच्या प्रोथोनोटरीला देण्याचे निर्देश गेल्या सुनावणीत दिले होते.