मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता सर्वत्र लॉकडाऊनचीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही महत्त्वाची माहिती दिली. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता काँग्रेसनंही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे. (health minister rajesh tope on rising corona cases and lockdown preparation)
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रच शेअर केलं आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच चव्हाण यांनी सरकारला दिलाय. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यापुढे पेचप्रसंग उभा आहे. सध्या, उद्योजकांपासून ते सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊन विरोध करत आपल मत मांडत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने काही बाबी लक्षात घ्याव्यात, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रातून सूचवलंय.
लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्यालॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ठेवावा. या दरम्यान, बुडणाऱ्या रोजगाराची सरकारने भरपाई द्यावी, ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. त्यासाठी, आमदार व खासदार यांच्या स्थानिक निधीचा वापर करावा. खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्यावी.शेतमाल व औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन, पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे. लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढवणे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी राज्य सरकारला अशा सूचना केल्या आहेत. तसेच, केंद्र सरकारने अचानक केलेल्या लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून जवळपास देशातील 3 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेखाली ढकलली गेल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलंय.
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय
राज्यात 3 दिवसांपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 'गेल्या वर्षी लॉकडाऊन केल्यावर स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला तरी त्याचं स्वरुप गेल्या लॉकडाऊनसारखं नसेल. कठोर लॉकडाऊन केला जाणार नाही,' असं टोपेंनी सांगितलं.
लॉकडाऊ हा उपाय नाही - मलिक
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी कालच लॉकडाऊन उपाय नसल्याचं म्हणत विरोध दर्शवला. त्यावर मंत्रिमंडळातून विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं टोपे म्हणाले. अर्थकारणाला धक्का लागणार नाही आणि नागरिकांचं आरोग्यदेखील जपलं जाईल अशा अनुषंगानं सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची गरजदेखील भासणार नाही. सध्या गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यावर भर देण्याचा विचार सुरू आहे, असं टोपे यांनी सांगितलं.