Join us

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी चार कोटींच्या ठेवी मोडणार, स्थायी समितीपुढे पालिका प्रशासनाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 8:59 PM

Mumbai News : गेल्या दीड वर्षांत याचा मोठा फटाका मुंबई महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.

मुंबई - कोरोना रुपी संकटाशी लढणाऱ्या मुंबई महापालिकेला दरमहा दोनशे कोटी रुपये खर्च करावे लागत आहे. त्याचवेळी उत्पन्नात मोठी घट होत असल्याने अंतर्गत ठेवतील निधीतील चार हजार कोटी विशेष प्रकल्प निधीत वळविण्याची परवानगी प्रशासनाने स्थायी समितीकडे मागितली आहे. या निधीतून पुलांची व पर्जन्य वाहिन्यांची कामं प्रामुख्याने केली जाणार आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रक्कमेच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत. मात्र तूर्तास हा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मुंबईत काही महिने लॉकडाऊन सुरू होते. गेल्या दीड वर्षांत याचा मोठा फटाका मुंबई महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या बँकेतील ठेवीतील चार हजार कोटी रुपये विशेष प्रकल्प निधीत वळविण्याची परवानगी प्रशासनाने मागितली आहे. पहिल्यांदाच पालिका मोठ्या ठेवी प्रकल्पांसाठी वापरणार आहे. विविध बँकांमध्ये महापालिकेच्या ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कोविड काळात उत्पन्न घटल्यावर पालिकेने ठेवींवर येणाऱ्या व्याजातून खर्च भागवला होता. मात्र, ठेवींना हात लावला नव्हता. यापूर्वी ठेवींवर कर्ज घेण्याचा विचारही पालिकेने केला होता. पण, तशी वेळ आली नव्हती.

प्रस्ताव राखून ठेवला...

पालिकेच्या ८० हजार कोटींच्या ठेवी असल्या प्रत्यक्षात १० ते १५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी प्रकल्पांसाठी वापरता येणाऱ्या आहेत. तर, इतर ठेवी कामगारांशी संबंधित व ठेकेदारांच्या अनामत रक्कम आहेत. त्यामुळे ही रक्कम भविष्यात परत द्यावी लागेल. त्यामुळे या ठेवी वळवता अथवा मोडताना सध्याच्या परिस्थितीच प्रशासनाने विचार करावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडली. हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला असून सर्व बाजूने विचार करुन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

एकूण निधीची गरज...

पालिकेने विशेष प्रकल्प निधी हा स्वतंत्र निधी निर्माण केला आहे. या अंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यासाठी सात हजार ८८४ काेटी रुपयांचा निधी लागणार आहे.

विविध प्राधिकरणाकडून महापालिकेला येणे...

मालमत्ता करवसुलीची संचित थकबाकी तब्बल १९ हजार कोटी रुपये आहे. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमीन अधिमूल्यापोटी ६१८ कोटी, पायाभूत सुविधा विकास आकारापोटी ९८२ कोटी रुपये अडकले आहेत. पालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. मात्र मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये घट होत आहे. 

या प्रकल्पांसाठी विशेष निधी....

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडीसीएल) मार्फत १६७५ कोटींचे १२ पुलांचे काम. तसेच अन्य फुलांच्या दुरुस्तीची अडीचशे कोटींची कामे. 

मिठी नदी, पोयसर, दहिसर वालभट नदींची कामं. नवीन पर्जन्य जलवाहिन्या पम्पिंग स्टेशन, बोगद्यांची कामे.

 

टॅग्स :मुंबई