लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैसे दुप्पट करण्याच्या नादात मुलुंडमधील ६० जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यात काहींनी आपली जमापुंजी गमावली आहे. याप्रकरणी गुरुवारी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे लेबर कॉन्ट्रॅक्टर अशोक इंगोले (वय ४०) यांच्या तक्रारीवरून अविनाश पोपट साळवे, बापू मोहन झांबरे, प्रदीप उपाध्याय, हर्षद पराड यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. इंगोले यांच्या तक्रारीनुसार, सप्टेंंबर २०१७ मध्ये अविनाश आणि बापूने त्यांना विजेता लकी ड्रॉ योजना सांगितली. याच योजनेत ३० महिन्यांसाठी महिन्याला एक हजार भरायचे. त्यातून प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढून विजेत्या मंडळीला ३० हजार रुपये देण्याचे ठरले. शिवाय कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे दुप्पट होऊन मिळणार असल्याचे आमीष दाखविले. सुरुवातीला नागरिकांना पैसेही मिळू लागल्याने गुंतवणूक वाढली. त्यात इंगोले यांनी सुरुवातीला ९० हजार, त्यानंतर दीड लाख करत पैसे दुप्पट मिळणार म्हणून गुंतवणूक केली.
अशात २०१९ पर्यंत त्यांनी गुंतविलेल्या रकमेपैकी १६ लाख परत मिळाले आणि २२ लाख ८ हजार रुपये अजूनही थकीत आहेत. काही दिवसाने आरोपींकड़ून पैसे मिळण्यास टाळाटाळ सुरू झाली. पैसे आज देतो, उद्या देतो करत वर्ष उलटले. यात त्यांच्यासारखे आणखी ५९ जण असल्याचे समजताच सर्वांनी मिळून मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांपासून नोकरदार, व्यावसायिक, ठेकेदार, सराफांचा समावेश आहे. यात पैसे दुप्पट होण्याच्या नादात काहींनी जमापुंजी गमावली आहे. यात एकूण दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.