भांडुप झाले नागरी समस्यांचे ‘आगार’
By admin | Published: June 14, 2016 01:53 AM2016-06-14T01:53:40+5:302016-06-14T01:53:40+5:30
मागील कित्येक वर्षांपासून नागरी सेवा-सुविधांच्या पूर्ततेसाठी आस लावून बसलेल्या भांडुपकरांच्या पदरी आजही निराशाच पडली आहे. रस्ते, पाणी, वीज, उद्याने आणि सुरक्षा अशा अनेक समस्यांनी
- लीनल गावडे, मुंबई
मागील कित्येक वर्षांपासून नागरी सेवा-सुविधांच्या पूर्ततेसाठी आस लावून बसलेल्या भांडुपकरांच्या पदरी आजही निराशाच पडली आहे. रस्ते, पाणी, वीज, उद्याने आणि सुरक्षा अशा अनेक समस्यांनी भांडुपमध्ये तोंड ‘आ’ वासले असून, विविध निवडणुकींदरम्यान लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने आजही कागदावरच आहेत. परिणामी, याच आश्वासनांची आठवण करून देत, भांडुपकरांनी नागरी सेवा-सुविधांवर पडणारा ताण कमी करावा आणि मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी री ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात ओढली.
भांडुप पश्चिम येथील सरदार प्रतापसिंह संकुलाच्या परिसरात रविवारी सकाळी नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी, ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक आमदार अशोक पाटील, संकुल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर शिंदे आणि ‘लोकमत’चे वितरण विभाग व्यवस्थापक शरद सुरवसे उपस्थित होते. ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात संकुलासह लगतच्या परिसरातील भांडुपकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. येथील नागरी समस्यांचा पाढा वाचताना नागरिकांनी पाणी, रस्ते, रस्त्यांवरील दिवे, सुरक्षा आणि भांडुप पश्चिमेकडील स्कायवॉक या मुद्द्यांवर प्रामुख्याने जोर दिला. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकींदरम्यान आश्वासनांची खैरात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी त्यांनी दिलेल्या ‘शब्दां’ची आठवण करून दिली. शिवाय नगरसेवक पदासह आमदार आणि खासदारकीसाठी झालेल्या निवडणुकांना वर्षे लोटली, तरीदेखील नागरी सेवा-सुविधा पूर्ण करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी हलगर्जीपणा बाळगल्याने नागरिकांनी नाराजी प्रकट केली.
आमदार म्हणतात, ‘कमी तिथे आम्ही...’
संकुलातील रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. हा रस्ता खासगी असल्यामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. हा रस्ता महापालिकेला सुपुर्द करावा, यासाठीचा आग्रह महापालिकेकडे आणि जागेच्या मालकाकडे केला आहे, ते कामही होईल. नागरिकांच्या मतदानामुळे आज इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे मीही तुमच्यालाच एक आहे आणि तुमच्या समस्या ऐकण्यासह त्यांचे निराकरण करण्यासाठी मी येथे आलो आहे. जनता मार्केटच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होणार आहे. शिवाय भांडुपच्या अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम होणार आहे. मी पक्षीय राजकारण करत नाही. तसे केल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यास वेळ मिळत नाही. मी २४ तास उपलब्ध आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ या व्यासपीठावरील समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन.
- अशोक पाटील, आमदार
भांडुप रेल्वे स्थानकाला दोन दरवाजे कधी?
मध्य रेल्वे मार्गावरील इतर रेल्वे स्थानकांप्रमाणे भांडुप रेल्वे स्थानकावरही दोन दरवाजे करण्यात यावेत, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. त्यानुसार हे काम होईल, अशी कित्येक आश्वासने आम्हाला देण्यात आली. मात्र, अद्यापही ते काम झाले नाही. आता तरी लोकप्रतिनिधींनी हे काम पक्षीय राजकारण बाजूला ठेवून करावे.
- प्रदीप जोशी
सात इमारतींच्या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी महापालिकेचे एकमेव उद्यान आहे. तेही सुरुवातीच्या काळी दुरावस्थेत होते. अनेक तक्रारींनंतर या ठिकाणी लहान मुलांसाठी नवीन खेळाचे साहित्य बसवण्यात आले, पण रात्री दिव्यांची सोय नसल्यामुळे रात्रभर टवाळखोर मुले आणि गर्दुल्ले या उद्यानाचा गैरवापर करतात. याकडे पालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा मुलांचे हक्काचे खेळण्याचे ठिकाण गर्दुल्ल्यांचा अड्डा होऊन बसेल.
- सचिन शिरसाट
संकुल परिसरात तीन शाळा आहेत. येथून अनेक नागरिक मुलांना शाळेला नेण्यासाठी सतत ये-जा करत असतात. येथील रस्त्याची अवस्था बिकट असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे कित्येक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. लोकप्रतिनिधी मत मागण्यासाठी येतात, तेव्हा संकुलातील सुधारणेसंबंधीची आश्वासने देऊन जातात. प्रत्यक्षात काहीच कामे करत नाही
- श्रीकृष्ण पाटणे
उन्हाळ््याच्या दिवसात पाण्यासाठी हाल होतात. मे महिन्यात १५ मिनिटांवर पाणी आलेले आठवत नाही. सकाळी ७ वाजता पाणी येते. सकाळची कामे आणि पाणी या सगळ््याचा गोंधळ उडतो.
- सुनिला गायकवाड
संकुल परिसरातील नागरिकांना पार्किंगची जागा नाही, पण येथील मोकळ््या जागेत अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. विशेष म्हणजे, या गाड्या पार्क करण्यासाठी गाडी मालकांकडून पैसे आकारल्यामुळे ते सोसायटीतील रहिवाशांना जुमानत नाहीत, शिवाय अनेक गाड्या संकुल परिसरात ये-जा करत असतात. या गाड्यांची नोंद नसते. सोसायटीतील रहिवाशांच्या गाड्यांशिवाय किमान २० ते ३० गाड्या या रस्त्यावर बाहेरच्याच असतात.
- विजय चव्हाण
ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या मीनाताई ठाकरे उद्यानाची डागडुजी करण्यात आलेली नाही. व्यायामासाठी असलेले अर्धे-अधिक साहित्य मोडकळीस आले आहे, तरी याकडे पालिका लक्ष देत नाही. विशेष म्हणजे, येथील उद्यानाची काळजी येथील नागरिक घेत आहेत. येथील झाडांनाही पाण्याचा पुरवठा उन्हाळ्याच्या दिवसात येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने केला आहे. पालिकेने या उद्यानाकडे लक्ष द्यावे.- वसंत नागप
खडीमशिनच्या ९० फुटी रस्त्यावर दुतर्फा ट्रक उभे असतात. रात्रीच्या वेळी या ट्रकमागे गैरप्रकार चालतात. या रस्त्यावरून येताना भीती वाटते. रात्रपाळीवरून येणाऱ्या महिलांना याचा त्रास होतो. विशेष म्हणजे, हे ट्रक संपूर्ण रस्ता अडवतात. त्यामुळे चालायचे कुठून, हा प्रश्नच निर्माण होतो.
- अंजली गावडे
संकुलातील समस्यांविषयी अनेकदा पालिका, आमदार, खासदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, पण त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आता तरी या भांडुपकरांच्या समस्येवर लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
- मनोहर शिंदे