अर्धवट नालेसफाईचे स्थायी समितीत पडसाद
By admin | Published: May 31, 2017 06:47 AM2017-05-31T06:47:41+5:302017-05-31T06:47:41+5:30
नालेसफाईची मुदत संपण्यास अवघे २४ तास उरले आहेत. यामुळे मुंबईत ९५ टक्के नाले साफ झाल्याचा दावा पालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नालेसफाईची मुदत संपण्यास अवघे २४ तास उरले आहेत. यामुळे मुंबईत ९५ टक्के नाले साफ झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार नालेसफाईचे काम व्यवस्थित करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे. याविरोधात पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज एकमताने तहकूब करण्यात आली.
ठेकेदार मिळत नसल्याने या वर्षी नालेसफाईला रडतखडत सुरुवात झाली. तरीही नालेसफाई दिलेल्या मुदतीत होणार असे प्रशासन छातीठोकपणे सांगत आहे. पालिकेच्या या दाव्यातील सत्य काँग्रेसने सोमवारी पाहणी दौऱ्यातून उजेडात आणले. नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत, अनेक नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवातही झालेली नाही. नाल्यांतून काढलेला गाळ नाल्यांच्या तोंडावर ठेवला जात आहे. ठेकेदारावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी नगरसेवकांना सुनावले
आपत्कालीन नियंत्रण कक्ष हा संवेदनशील कक्ष आहे. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी इतरांना प्रवेश दिला जात नाही. नगरसेवक त्या कक्षात जाऊ शकतात. मात्र इतर व्यक्तींना या कक्षात जायचे असल्यास त्यांना परवानगीशिवाय जाता येणार नाही, अशा शब्दांत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी नगरसेवकांना सुनावले.
नेत्यांचा अपमान मान्य नाही...
मुंबई तुंबल्यास ओढवणाऱ्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष कसा सामोरे जाणार आहे, याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष संंजय निरुपम यांना मज्जाव करण्यात आला. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीमध्ये आज उमटले. प्रशासनाच्या निष्क्रिय आणि उदासीन कारभाराचा निषेध करीत स्थायी समितीची बैठक झटपट तहकूब करण्यात आली. या सभा तहकुबीला शिवसेना आणि भाजपासह सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.