अग्निरोधक यंत्रणेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:56 AM2019-12-24T02:56:31+5:302019-12-24T02:56:50+5:30

मुंबई आगीच्या तोंडावरच; आतापर्यंत २९ हजार घटनांत ३०० बळी

Depression among Mumbaiis about fire suppression systems | अग्निरोधक यंत्रणेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता

अग्निरोधक यंत्रणेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता

Next

मुंबई : गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून, यात ३०० जणांचा बळी गेला आहे. मुंबई शहरात ज्या इमारतींना मालमत्ता कर लागू होतो; अशा २ लाखांहून अधिक इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २५ हजार इमारती सात मजल्यांहून अधिक मजल्यांच्या आहेत. येथे प्रत्येकाने अग्निशमनाचे नियम पाळले पाहिजेत. मात्र अग्निशमन दलाकडून वारंवार सूचना करूनही उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे दिसून येते. परिणामी आगीच्या घटना घडल्यास अग्निरोधक यंत्रणा मदतीस येत नाही. परिणामी मदत कार्यात अडथळे येतात; आणि मनुष्यहानी होते.

मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे, अयोग्य विद्युत जोडणीमुळे आग लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग याबाबत अत्यंत सजग असणे गरजेचे आहे. परिणामी, विद्युत उपकरणांनुसार किती क्षमतेचा विद्युत प्रवाह (वीजदाब) लागणार आहे, याची तपासणी करून त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. परंतु रहिवासी अथवा व्यावसायिक इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली असते. मात्र, अनेक वेळा रहिवाशांकडून यंत्रणेची तपासणी वेळोवेळी केली जात नाही. विशेषत: तपासणी होत नसल्याने यंत्रणा सुरू आहे की बंद, याची माहिती मिळत नाही. परिणामी, ऐन वेळी दुर्घटना घडल्यास यंत्रणा नादुरुस्त असेल तर धोका वाढतो. परिणामी आगीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महापालिकेने विद्युत जोडणी, विद्युत उपकरणे, वायरिंग आदींबाबत अत्यंत सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगत, अग्निसुरक्षेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहन महापालिकेसह अग्निशमन क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुंबईकरांना वारंवार केले आहे.

दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे ?

च्उंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची असून, वर्षातून दोनदा अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती केली तर याच यंत्रणा मुंबईला आगीपासून वाचवू शकतात.
च्इमारतींमध्ये फायर हॉस हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, आॅटोमॅटिक स्प्रिंक्लर सिस्टिम असणे गरजेचे आहे. नुसते असणे महत्त्वाचे नाही, तर या यंत्रणा कार्यान्वित आहेत ना याचीदेखील तपासणी होणे गरजेचे आहे.

च्विद्युत खटके (बटन/स्विच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे हे वीजदाब क्षमतेला अनुरूप, तसेच आयएसआय प्रमाणित असावेत.
च्त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करून घ्यावी.
च्मीटर केबिनसह, ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, तेथे मेन स्विच तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत.
च्अन्न शिजविले जाते किंवा पदार्थ तयार केले जातात, त्या खोलीत गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी-जास्त असू शकते. हे पाहता तेथील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणांची तपासणी नियमित करावी.

२०१९ मध्ये घडलेल्या आगीच्या काही दुर्घटना
१० फेब्रुवारी : माहुल येथील इमारत क्रमांक १४ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांनाही बसल्या. एका मजल्यावर ३४ घरे असून, १००हून अधिक कुटुंंब येथे वास्तव्य करतात. वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
१८ एप्रिल : गोरेगाव पूर्वेकडील आरे रोडवरील युनिट नंबर २९मधील एमेराल्ड क्लबमध्ये आग लागली. सहा जण जखमी झाले.
५ मे : अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील तळमजला अधिक सात मजली ‘सरिता’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. आगीत तिघे जण जखमी झाले.
२४ मे : भेंडीबाजारातील बोहरी मोहल्ला येथील तळमजला अधिक चार मजल्यांच्या पंजाब महाल इमारतीच्या तिसºया मजल्यावरील आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अकरा जण जखमी झाले.
१६ जुलै : विक्रोळी येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सूर्या नगरमधील बॉम्बे गॅस येथे सिलिंडर स्फोटात तीन जण जखमी झाले. तीन जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. दोन जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

२१ जुलै : कुलाबा येथील तळमजला अधिक चार मजली चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसºया मजल्यावर आग लागून एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. येथे १४ लोकांना या दुर्घटनेतून बाहेर काढण्यात आले.
२२ जुलै : वांद्रे पश्चिमेकडील नऊ मजली एमटीएनएल इमारतीच्या तिसºया आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ८४ हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले.
१० सप्टेंबर : वडाळा येथील गणेश नगर, निर्मल विद्यालयाजवळ टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य वीजवाहिनीची ओव्हरहेड वायर घराच्या छताला लागून स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे येथील खोली क्रमांक ३५३ या घरास लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले तर एका मांजरीचा मृत्यू झाला.
१७ डिसेंबर : घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रोड ४ वरील तळमजला अधिक दहा मजली श्रीजी टॉवरच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाकडून गच्ची आणि जिन्याच्या मदतीने १३ रहिवाशांचे जीव वाचविण्यात आले.
२२ डिसेंबर : विलेपार्ले येथील बजाज रोडवरील तळमजला अधिक तेरा मजली लाभ श्रीवल्ली या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील दोन ते तीन कार्यालयांना आग लागली. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
 

Web Title: Depression among Mumbaiis about fire suppression systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.