बंगालच्या उपसागरात डिप्रेशन, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे धोक्याचा इशारा, पुन्हा बरसणार कोसळधारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:14 AM2023-07-26T05:14:46+5:302023-07-26T05:15:00+5:30
नवी दिल्ली/ मुंबई : राज्यभरात सक्रिय मान्सूनने बहुतांश ठिकाणी सरासरी गाठली असतानाच, आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा ...
नवी दिल्ली/मुंबई : राज्यभरात सक्रिय मान्सूनने बहुतांश ठिकाणी सरासरी गाठली असतानाच, आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारसाठी रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट असून, येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडून निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परिणामी दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील राज्यांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे काही घरांची पडझड होण्यासह दोन पूल वाहून गेले आहेत.
अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
मंगळवारी पहाटे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांत २७ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
याशिवाय कमी दाबाच्या या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि उत्तरेकडील भागांत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
दक्षिणेकडील कर्नाटक राज्याला गेल्या काही दिवसांपासून पाऊस झोडपून काढत असून, संततधारेमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळातील आपले सहकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
राज्यात दोन दिवस अशा बरसणार धारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, २६ जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर २७ जुलैला पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भातील अमरावती, यवमतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.