मुंबईत चार मधुमेही रुग्णांपैकी एकाला नैराश्य

By admin | Published: June 18, 2017 02:49 AM2017-06-18T02:49:32+5:302017-06-18T02:49:32+5:30

कामामुळे दगदगीचे वेळापत्रक, वाढत्या अपेक्षा, सोशल मीडियाशी असलेली अतिजवळीक, संवादाचा अभाव यांमुळे नैराश्य आणि चिंताग्रस्तपणा हा कळीचा मुद्दा बनला

Depression in one of the four diabetic patients in Mumbai | मुंबईत चार मधुमेही रुग्णांपैकी एकाला नैराश्य

मुंबईत चार मधुमेही रुग्णांपैकी एकाला नैराश्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कामामुळे दगदगीचे वेळापत्रक, वाढत्या अपेक्षा, सोशल मीडियाशी असलेली अतिजवळीक, संवादाचा अभाव यांमुळे नैराश्य आणि चिंताग्रस्तपणा हा कळीचा मुद्दा बनला आहे. मुंबईतील २०० मधुमेही रुग्णांच्या सर्वेक्षणानंतर असे आढळून आले की, दर चौथी मधुमेही व्यक्ती नैराश्यावरील उपचार घेत आहे. महिलांमध्ये तरुणींना चिंतातुरपणाची समस्या अधिक भेडसावते, तर पुरुषांमध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींना नैराश्यावर उपचार घ्यावे लागत आहेत.
एका खासगी संस्थेने जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या कालावधीत त्यांच्या बाह्यरुग्ण विभागात याबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, २८.५ टक्के रुग्ण हे नैराश्यग्रस्त आहेत. जागतिक मधुमेह फेडरेशनच्या आकेडवारीनुसार, २०१५ साली देशात ६९.१ दक्षलक्ष मधुमेही होते. मधुमेहींची वाढती संख्या हा कळीचा मुद्दा आहेच. त्याचप्रमाणे, त्यांच्यापैकी नैराश्यावर उपचार घेणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे. या सर्वेक्षणासाठी २०० मधुमेहींची पाहणी करण्यात आली. त्यांच्यापैकी १०५ पुरुष होते, तर ९५ महिला होत्या. यापैकी ३७ महिला आणि २० पुरुष नैराश्यावरील औषधोपचार घेत होते. ३७ ते ६० या वयोगटातील महिलांमध्ये नैराश्य अधिक प्रमाणात होते, यात २५ महिला तर ९ पुरुषांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिकांपैकी १२ महिला आणि ११ पुरुष नैराश्यावरील औषध घेत होते.
बदलती जीवनशैली, व्यावसायिक तणाव, कुटुंबाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. काही महिला नोकरीच्या आणि घरकामाच्या व्यापात इतक्या व्यस्त होतात की, त्यांना काहीच सामाजिक आयुष्य उरत नाही. काही जणी घरातच अडकून बसतात आणि शरीरात मासिक पाळीच्या कालावधीत हॉर्मोनचे बदल होत असताना नैराश्य येते. ज्येष्ठ नागरिकांना वाढते वय, एकटेपणा, वाढते आजार आणि त्यांचा खर्च यांच्याशी जुळवून घेणे कठीण होऊन बसते. तरुण मधुमेहींची सोशल मीडियाशी असलेली अतिजवळीकता आणि उपकरणांना चिकटून असल्यामुळे चिंताग्रस्त होण्यात वाढ होते, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले.

नैराश्यातून बाहेर येण्यासाठीच्या उपाययोजना नैराश्यातून बाहेर येण्यासाठी कुटुंबाची साथ हवी, केवळ औषधोपचार करून नैराश्यावर मात करता येणार नाही.
आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांना नैराश्य येणार नाही, याची काळजी घेणे हे सर्वांसाठी आवश्यक असते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांबाबत ही काळजी अधिक घेण्याची आवश्यकता असते, असेही डॉ. गाडगे सांगितले.

Web Title: Depression in one of the four diabetic patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.