उपायुक्तांची खुर्चीही अस्थिर
By admin | Published: October 24, 2015 01:47 AM2015-10-24T01:47:49+5:302015-10-24T01:47:49+5:30
क्राइम ब्रँच पोलीस दलाचा कणा समजला जातो. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र या विभागाची प्रयोगशाळा करून टाकली आहे. २००५ पासून एकाही उपायुक्तांना कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
नामदेव मोरे, नवी मुंबई
क्राइम ब्रँच पोलीस दलाचा कणा समजला जातो. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र या विभागाची प्रयोगशाळा करून टाकली आहे. २००५ पासून एकाही उपायुक्तांना कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. गुन्हे शाखेच्या प्रमुखांचीच खुर्ची अस्थिर असल्यामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये २००५ मध्ये गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदावर डॉ. शशिकांत महावरकर यांची नियुक्ती केली. महावरकर यांच्या काळात एक एन्काउंटर करण्यात आला होता. याव्यतिरिक्त फारसा प्रभाव दाखविता आला नव्हता. यामुळे २००७ मध्ये अमर जाधव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. या टीमने चांगल्या प्रकारे काम केले होते. अनेक गुन्ह्यांचा उलगडा करून दबदबा तयार केला होता. परंतु त्यानंतर गुन्हे शाखेच्या उपआयुक्तांची व अधिकाऱ्यांचीही बदली होवू लागली. गुन्हे शाखेच्या बळकटीकरणाकडे कोणीच लक्ष दिले नाही. बदल्यांच्या सत्रामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावरही परिणाम होवू लागला. एकाही उपायुक्तांना चांगली टीम तयार करता आली नाही. टीम तयार होताच दुसऱ्या अधिकाऱ्यांची प्रमुख पदावर नियुक्ती होऊ लागली. मुंबई क्राइम ब्रँचचा दबदबा देशात सर्वत्र आहे. परंतु शेजारीच असलेल्या नवी मुंबईमध्ये मात्र क्राइम ब्रँच असून नसल्यासारखी झाली आहे.
गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदावर आॅगस्ट २०१४ मध्ये सुरेश मेंगडे यांची नियुक्ती केली होती. मेंगडे यांनी १४ महिन्यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचा प्रचंड दबदबा निर्माण केला. छोटा राजन, रवी पुजारीसह त्यांच्या टोळीतील प्रमुख गुंडांवर मोक्काची कारवाई केली. सोनसाखळी, वाहन चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या गजाआड केल्या. पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी स्पर्धा सुरू होती. अनेक गुन्ह्यांचा उलगडाही झाला होता. पोलिसांविषयी समाजामध्ये चांगली प्रतिमा जात असताना अचानक त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. चांगले काम केल्यानंतरही बदली का केली याचे कोडे अद्याप कोणालाच सुटलेले नाही.
बदलीमध्ये राजकारण झाल्याची चर्चा
१आयुक्तालयामध्ये आवश्यकतेप्रमाणे पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात येतात. त्यामुळे बदल्या झाल्यानंतर फारशी चर्चा होत नाही. गुन्हे शाखेची कामगिरी चांगली असताना व गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाणही वाढले असताना बदली का झाली याचे कोडे उलगडले नाही.
२बदलीमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदावर नियुक्ती झालेले दिलीप सावंत यांची नवी मुंबईत नियुक्ती झाल्यानंतर त्यांना परिमंडळ दोनचा कार्यभार देण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु विश्वास पांढरे यांची तेथे नियुक्ती केली असल्यामुळे त्यांना मुख्यालय उपायुक्त पदावर नियुक्त केले . त्यांचे परिमंडळसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. नंतर त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्तपद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती.
३अखेर त्यांची या पदावर नियुक्ती झाल्यामुळे पोलीस दलामध्ये पुन्हा याविषयी बोलले जात आहे. या तर्कवितर्कांना काहीही आधार नाही. सावंत हेही चांगले अधिकारी आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अशाप्रकारे काहीही झालेले नसून, कोणत्याही प्रकारे वशिलेबाजीने ही नियुक्ती झाली नसल्याचे सांगितले आहे. हे वास्तव असले तरी पोलीस दलामध्ये सुरू असलेली चर्चा कशी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
४वास्तविक पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पदभार स्वीकारल्यापासून चांगले काम केले आहे. कोणताही गाजावाजा न करता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याबरोबरच गुन्हे प्रकटीकरण चांगल्या प्रकारे होईल याकडे लक्ष दिले आहे.
५परिमंडळ व गुन्हे शाखेमध्ये योग्य समन्वय साधला होता. परंतु गुन्हे शाखेच्या उपायुक्तांची बदली व नियुक्तीमुळे पसरू लागलेल्या अफवा थांबवून पूर्ववत कामकाज ते कसे सुरू करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीम वर्कमुळे कामगिरीत सातत्य
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत परिमंडळ उपआयुक्त व गुन्हे शाखेच्या प्रमुखांमध्ये अनेक वेळा मतभेद झाल्याचे अनुभवता आले. परंतु सुरेश मेंगडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून परिमंडळ एक व दोन व गुन्हे शाखा यांच्यामध्ये चांगला समन्वय तयार झाला होता. परंतु अचानक झालेल्या बदल्यांमुळे हे टीमवर्क टिकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२००५ पासून गुन्हे शाखेचे उपायुक्त पुढीलप्रमाणे...
शशिकांत महावरकर, १ वर्ष १० महिने
अमर जाधव, ९ महिने
प्रवीण पवार, ८ महिने
एन. डी. चव्हाण, २ महिने
डी. टी. शिंदे, ३ वर्ष (सर्वाधिक काळ)
श्रीकांत पाठक, २ वर्षे २ महिने
सुरेश मेेंगडे, १ वर्ष २ महिने
दिलीप सावंत, नवनियुक्त उपायुक्त