मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी झाला. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, २५ नेत्यांनी मंत्रिपदाची, तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे, त्यावरून नाराजीनाट्य रंगलं असतानाच, राजकीय वर्तुळाच्या नजरा खातेवाटपावर खिळल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं संभाव्य खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, अजित पवार यांना अर्थ व नियोजन खातं दिलं जाऊ शकतं, तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं म्हटलं आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटपः
एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब- सीएमओ
आदित्य ठाकरे- पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत- परिवहन
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य खातीः
अनिल देशमुख- गृह खातं
अजित पवार- अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील- जलसंपदा
दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
नवाब मलिक- अल्पसंख्यांक
हसन मुश्रीफ- सहकार
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
काँग्रेसच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप:
बाळासाहेब थोरात- महसूल खातं
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
खातेवाटपाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल म्हटलं होतं.
दरम्यान, गेल्या सोमवारी महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर लगेचच सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही.