Join us

'काही लोक बोलताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की...'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

By मुकेश चव्हाण | Published: February 08, 2021 4:12 PM

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर निशाणा साधला आहे. 

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी वीजबिल दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आधी वीजबिल माफ करू म्हटले. पण अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, असं जाहीर केलं. हे सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

राज ठाकरेंच्या या आरोपानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असं स्पष्ट केलं होतं. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर निशाणा साधला आहे. 

अजित पवारांनी राज ठाकरेंनी केलेल्या आरोपाबाबत विचारला असता, ते म्हणाले की, या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात. वास्तविक पाहता शरद पवारांचा या राज्याशी 60 वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे शरद पवार असं कधीच करू शकत नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

तत्पूर्वी,  राज ठाकरेंनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. आगामी काळात भाजपासोबत जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत. त्यामुळे आज त्यांनी असं विधान केलं, अशी टीका नवाब मलिक यांनी केली होती. तसेच शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय बातम्या होत नाही, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला होता.

दरम्यान, राज्य सरकार आणि वीज कंपन्यांचं साटंलोटं असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं हेच कळत नाही. मुलांच्या परीक्षांचाही ते विचार करत नाही. वीज बिल माफ करण्यासाठी कंपन्यांशी बोलावं लागेल. पण या चर्चाच थांबल्या आहेत. मग यात काहीतरी साटंलोटं असल्याशिवाय चर्चा थांबल्या असतील का? सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करतंय, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली होती. 

कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा", असं राज ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी आज इतक्या थंडीत तिथं आंदोलन करतोय. आणखी किती दिवस हे प्रकरण चिघळवणार. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र बसावं आणि प्रश्न सोडवावा, असंही राज ठाकरे म्हणाले होते. 

शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली?

राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीजबिलाच्या मुद्द्यावर बोलणं झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. "शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेला या सर्वांशी शरद पवार बोलणार होते. पण ५-६ दिवसांनी मला कळालं की गौतम अदानी शरद पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारणमहाराष्ट्र