मविआ'तील 'त्या' मतावर अजित पवार महायुतीतही ठाम, फडणवीसांसमोरच केला शब्दाचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:37 PM2024-03-11T12:37:41+5:302024-03-11T12:43:25+5:30
मुंबईतील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील वरळीते मरीन ड्राइव्ह या एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
Ajit Pawar ( Marathi News ) : मुंबई- मुंबईतील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील वरळीते मरीन ड्राइव्ह या एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी तिनही नेत्यांनी भाषणं केली. यावेळी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख 'स्वराज्य रक्षक' असाच केला, यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते, फडणवीसांनी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख 'धर्मवीर' असाच केला. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असताना या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले होते.
अजित पवार महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळी या मुद्द्यावरुन राज्यभरात वाद सुरू झाला होता. अजित पवार या मुद्द्यावर ठाम होते, आता अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होऊनही 'स्वराज्य रक्षक' या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसत आहे.
"मला भूमिपूजनलाही बोलावलं नाही"; फडणवीसांची खंत, उद्धव ठाकरेंवर निशाणा
कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्ताने त्यांच्या त्यांगाला वंदन करतो. मुंबईतील कोस्टल रोडमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन रस्ते कॉन्क्रिटीकरण करुन रस्त्याचे स्वच्छतेचं काम सुरू आहे. या रोडमुळे हवेचे प्रदुषणही कमी होत आहे, असंही पवार म्हणाले.
मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका खुली
मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी मार्गिका खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे.
‘कोस्टल’मुळे पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती.