Join us

राज ठाकरेंना घरात बसून बोलायला काय जातं; गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 6:49 PM

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई- ३ मे रोजी ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी पोलीस देखील सज्ज झाले आहेत. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी निशाणा साधला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरे भाजपा विरोधात बोलत होते. त्यानंतर आता त्यांचे मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन झाले आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र घरात बसून बोलायला काय जाते, गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील, असं अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल-

१ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेअजित पवारमनसेराष्ट्रवादी काँग्रेसपोलिस