'लेक लाडकी' योजनेची बातमी पहिलीत शिकणाऱ्या मुलीने वर्गात वाचून दाखवली अन्...; फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:04 PM2023-03-10T23:04:53+5:302023-03-10T23:05:01+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली.
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी बऱ्याच विशेष घोषणांची तरतूद करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, विकास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारनेही अतिशय महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. 'लेक लाडकी' ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. यामध्ये मुलींना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ठराविक रक्कम दिली जाणार आहे. लेक लाडकी या योजना सुरु केल्याने मुलींमध्ये आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज लेक लाडकी योजनेबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या अयोध्या साबळे हिने (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी,ता.वैजापूर, जि. औरंगाबाद) तिच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना वाचून दाखवली. ही बातमी ऐकून बालाकांचा निरागस जल्लोष पाहा, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात 'लेक लाडकी' योजना सुरू केली.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 10, 2023
लेक जन्मास आल्यानंतर तिच्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या रकमेत भरघोस वाढ केली.
ही अत्यंत आनंदाची 'बातमी' पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या अयोध्या साबळे हिने (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…https://t.co/lDiHMzdcvopic.twitter.com/7ubokf1lB0
काय आहे नेमकी योजना?
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे.
अल्प उत्पन्न गटातील मुलींनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. याशिवायही महिलांना एसटी प्रवासात सूट, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ यांसारख्या अनेक योजना जाहीर केल्या. त्यामुळे अर्थसंकल्प महिलांच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असल्याचे चित्र आहे.