Join us

कितीही जोडो यात्रा काढा, नरेंद्र मोदी जनतेच्या मनात आहेत, ते हटणार नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 2:06 PM

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

मुंबई- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करेल. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.    

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे कितीही जोडो यात्रा केल्या, तरीही नरेंद्र मोदी हटणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच आमचं सरकार मजबूत आहे. मध्यावधी निवडणुकीच्या वावड्या उठवण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली. 

दरम्यान ,यात्रा नांदेडात चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी-वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवारांच्या सहभागाची उत्सुकता आहे. तसेच राहुल गांधींना महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो हे आगामी १५ दिवसांत दिसून येणार आहे.

पहिल्यांदाच मशाल यात्रा- 

भारत जाेडाे यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. ८ नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराहुल गांधीनरेंद्र मोदीकाँग्रेस