मुंबई- आम्ही लाऊडस्पीकरवरून सरकार पडण्याच्या तारखा देणार नाही. भाजपाच्या पिपाण्या वाजत होत्या. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. सरकार मजबूत पायावर नाही. कुणाला सनईचौघडे वाजवायचे वाजवू द्या. भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरू आहे. आमचा लाऊडस्पीकर महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहे. या लाऊडस्पीकरवरील गर्जना ऐकण्यासाठी लोकं शिवसेनेच्या मागे उभे आहेत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
महाराष्ट्रात ज्यांनी चोऱ्यामाऱ्या करून सरकार स्थापन केले त्यांच्या छातीत धडकी भरवणारी गर्दी आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत दिसत आहे. राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिकांच्या अश्रूत हे सरकार वाहून जाईल. अंतर्हकलहाने हे सरकार पडेल. एक महिन्यानंतरही तुम्ही हम दोनो एक दुजे के लिए या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये अडकून पडलाय. किती वेळा दिल्लीला जाणार? शिवसेना संभाजीनगरमध्ये दिसली ती सत्तेत असणारी नाही. आधी सरकार स्थापन करा मग बोला असंही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संजय राऊतांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांना आता, तरी समज आली पाहिजे. त्यांनी काय पक्षाची अवस्था करुन ठेवलीय. तुम्ही मला का त्यांच्याबद्दल विचारता, सेन्सिबल माणासाबद्दल प्रश्न विचारा, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, भाजपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. त्यात चंद्रकांत पाटील यांनी विधान केले त्याचे स्वागत करतो. जे पोटात मळमळत होते ते ओठावर आले. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेचा आदर व्हायला हवा. शिवसेना मराठी माणसाची भूमिका मांडत राहीन. सकाळी ९ नव्हे तर २४ तास मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील, असं संजय राऊत म्हणाले.
माझ्यावर कुठलीही कारवाई करा- संजय राऊत
प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश, घराघरातील महिलेचा हुंकार हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कुठलीही कारवाई करा. तुमची सगळी कारस्थाने मला माहिती आहे. मी कारवाईला सामोरं जायला तयार आहे असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला.