उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री घेतली खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: March 14, 2024 10:07 AM2024-03-14T10:07:50+5:302024-03-14T10:08:13+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांची कांदिवली पश्चिम पोयसर जिमखान्या समोरील बल्यू इम्प्रेस सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील निवासस्थानी सुमारे पाऊण तास भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चा झाली.
मुंबई - उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपाने आगामी लोकसभेचे तिकीट नाकारून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री खासदार गोपाळ शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांची समजूत काढली. प्रदेश भाजपा आपल्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांची कांदिवली पश्चिम पोयसर जिमखान्या समोरील बल्यू इम्प्रेस सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील निवासस्थानी सुमारे पाऊण तास भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चा झाली. शेट्टी यांच्या पत्नी उषा शेट्टी, मुलगा राकेश आणि सून ऐश्वर्या आदी त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. फडणवीस यांचे काल रात्री 11.15 वाजता त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. मध्यरात्री 12.05 मिनिटांनी फडणवीस तिकडून रवाना झाले.
याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता,फडणवीस यांनी आपली काल रात्री आपल्या निवासस्थानी भेट घेतली. प्रदेश भाजपा आपल्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
तिकीट नाकारल्यावर उमटले पडसाद
दरम्यान गोपाळ शेट्टी यांना काल भाजपाच्या केंद्रिय समितीने तिकीट नाकारल्यावर त्याचे मतदार संघात आणि राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले.
शेट्टी यांना भाजपाने तिकीट नाकारल्यावर शिवसेना आणि इतर पक्ष त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला सांगितले की,शेट्टी यांनी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात यावे,त्यांचे आमच्या पक्षात त्यांचे सन्मानाने स्वागत करू.आज आपण त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे पोतनीस म्हणाले.
याबाबत विचारले असता,शेट्टी यांनी सांगितले की,गेली 32 वर्षे भाजपाने मला तीन वेळा नगरसेवक,दोनदा आमदार आणि दोनदा खासदार केले.पक्षाने मला सर्व काही दिले,आणि कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी खूप प्रेम दिले.त्यामुळे मी शेवटपर्यंत भाजपातच राहणार असून जनतेची सेवा करणार आहे.भाजप सोडून माझा इतर ठिकाणी जाण्याचा काडीमात्र मनातही विचार नाही.
भाजपालाच माझे पाहिले प्राधान्य असून माझा दुसरा सॉफ्ट कॉर्नर हा बाळासाहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेनेसाठी आहे.येत्या दहा वर्षात देशहितासाठी शिवसेनेने भाजप सोबत यावे अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.