Join us

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

By मनोहर कुंभेजकर | Published: October 22, 2023 11:56 AM

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई: आपल्या व्यंगाची पर्वा न करता... प्रबळ इच्छाशक्तीचा जोरावर... मालाड येथील रामलीला मैदानात आयोजित 'रंगिला' या गरब्यात गरबा खेळत दिव्यांगांनी 'हम भी किसीसे कम नही' हे दाखवून दिले. दिव्यांचा उत्साह पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांच्या सोबत गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी देखील या दिव्यांगांसमवेत संगीताच्या ठेक्यावर गरबा खेळला. तर दिव्यांगांनी सुद्धा गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबईसह उपनगरात सर्वत्र नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मालाड (पूर्व) भागातील रामलीला मैदानावर भाजप वार्ड क्रमांक ४५, साई प्रबोधिनी ट्रस्ट व भाजप प्रवक्ते नेते विनोद शेलार यांनी आयोजित केलेल्या 'रंगीला' गरबा दांडियात दिव्यांग गरबा प्रेमींनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली. दिव्यांगांच्या जिवनात अधिक आनंद व उत्साह निर्माण करण्याबरोबरच आपली सामाजीक बांधिलकी जपत शेलार यांनी दिव्यांगांना गरबा खेळण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार दिव्यांग बंधू व भगिनी गरब्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गरब्याला भेट देत दिव्यांगांसमवेत गरबा खेळला.

यावेळी मैदानावर हजारो गरबा प्रेमींमध्ये तरुणीसह, महिला, ज्येष्ठ नागरिक सुद्धा गरबा खेळण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळाले. 

मागच्या वर्षी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते. यावर्षी सुद्धा आले. पण यावर्षी जास्त आनंद झाला. तीन दिवस आम्ही दृष्टीहीन मुलांसाठी दांडियाचे आयोजन केलं. सातव्या दिवशी आम्ही विशेष दिव्यांगासाठी गरबा दांडियाचे आयोजन केले. मला विशेष आनंद होत आहे की, मी एका विशिष्ठ समाजापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न करीत आहे.- विनोद शेलार, आयोजक

दिव्यांग नागरिकांच्या प्रतिक्रिया -गरबा खेळुन आम्हाला फार आनंद झाला. आम्ही पाहिल्यादा याठिकाणी सहभागी झालो आहोत. - मनीषा केनी

 आयुष्यात मी पहिल्यांदाच गरबा खेळला.. मी खूप खूष आहे. आम्हाला गरबा खेळायची माजी नगरसेवक विनोद शेलार यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. - सुशीला बागवे, मालाड

आमच्या साठी त्यांनी हा प्लॅटफॉम उपलब्ध करून गरबा खेळण्याची संधी दिल्याचा खुपच आनंद होत आहे. याठिकाणी खूप चांगल आयोजन केलं.- अशिष शुक्ला- मालाड 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसगरबानवरात्री