Join us

'शिवतीर्थ' वर देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात २ तास बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:24 PM

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते.

मुंबई - राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा आल्यानंतर भाजपा-राज ठाकरेंची जवळीक झाली. त्यात आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्वावरून एकमत झाले आहे. 

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवलं होते. या पत्रातून राज यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचं सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका असंही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ही भेट झाली आहे. 

फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशा चर्चा सुरू झाल्या. कारण मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्ष निवडीत, बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे-भाजपा एकत्र येणार असं बोललं जात आहे. त्यात नुकतेच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेणार असल्याची बातमी समोर आली. मात्र राज यांनी या वृत्ताचं खंडन केले. मात्र राज-फडणवीस यांच्या भेटीने नक्कीच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.  

 

गेल्या महिन्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर मनसेदेखील पुढे आली आहे. अमित ठाकरे सध्या पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यात शिवसेना कुणाची असा प्रश्न उभा राहिला. कारण शिवसेनेचे तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेला आणखी शह देण्यासाठी राज ठाकरेंना बळ देण्याचं काम भाजपा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :मनसेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरे