Join us  

"महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता, नेव्हीने..." मालवण घटनेनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:10 PM

Devendra Fadnavis : मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली.

Devendra Fadnavis ( Marathi News )  काल मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. या प्रकरणी राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले; सागर बंगल्यावरील 'त्या' बैठकीत...

"छत्रपती शिवराय यांचा जो पुतळा खाली आला ही आपल्या सगळ्यांसाठी दु:खद घटना आहे. या घटनेमुळे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या आहेत. मात्र, त्याच्यावर जे राजकारण चालले आहे. ते अधिक वेदनादायी आहे. जो खरा छत्रपतींचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही.हे करणं अतिशय चुकीचं आहे, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा पुतळा महाराष्ट्र सरकारने तयार केला नव्हता. नेव्हीने चांगल्या हेतुने हा पुतळा तयार केला होता. मात्र, त्यांनी ज्यांना  दिले कदीचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात यांचे योग्य आकलन करता आले नाही. त्या हिशोबाने त्यांना त्याचे डिझाइन करता आलेले नाही. किंवा अशा ठिकाणी जेव्हा आपण पुतळा लावतो तेव्हा समुद्राच्या वाऱ्यामुळे लोखंड गंजते का याचे आकलन नव्हते का? याची चौकशी सुरू आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

"आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य पुतळा तयार करायचा आहे. आम्ही नेव्हीच्या मदतीने पुन्हा तसा पुतळा तिथे उभा करु, कोणीही यावरुन राजकारण करु नये असं आम्हाला वाटतं, असंही फडणवीस म्हणाले. 

दोन जणांविरोधात गुन्हा दाखल 

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने  शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. 

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपा