"मला पक्षाने दिल्लीला जायला सांगितलं तर..."; राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 08:00 PM2024-08-29T20:00:26+5:302024-08-29T20:09:54+5:30
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले.
Devendra Fadnavis ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. तर दुसरीकडे काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी भाजपात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपद देणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चर्चांवर आज स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
हरियाणाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर निर्णय झाला; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
देवेंद्र फडणवीस यांनी आज 'न्यूज18 इंडिया' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवरही भाष्य केले. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा चर्चा चालत राहतात. ज्यावेळी बातम्या नसतात तेव्हा अशा बातम्या चालवल्या जातात, माझ्या पक्षाला मी चांगल्या पद्धतीने जाणतो. माझी महाराष्ट्रात काय गरज आहे हे पक्षाला माहिती आहे. यासाठी माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवणार. मी महाराष्ट्रात राहणार. पण, ज्यादिवशी माझा पक्ष मला दिल्लीला येण्यासाठी सांगणार त्यादिवशी मी दिल्लीला जाणार, असंही फडणवीस म्हणाले.
"मला पक्षाने जर नागपूरमध्ये जायला सांगितलं तर मी नागपूरला जाणार. मी पक्षाचा सैनिक आहे पण जे काय सुरू आहे त्या फक्त अफवा असल्याचं मी पक्क सांगू शकतो. तुम्ही त्या चर्चांवर विश्वास ठेवू नका, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी जातो. ममता बॅनर्जीही जातात. विरोधी पक्षनेते आणि सगळेच मुख्यमंत्री जातात. कारण प्रदेशाचा विकास करायचा असेल तर पंतप्रधानांना भेटलेच पाहिजे. पण, तुम्ही जेव्हा लाचार होऊन सोनिया गांधी यांच्याकडे जाऊन मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा सांगता. तेव्हा तिकडून तुम्हाला असं होऊ शकत नाही म्हणून सांगण्यात येतं. तेव्हा आता लाचारी कोण करत आहे?, असा निशाणा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.