Join us

वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 7:57 AM

महावितरणच्या बिलांबाबत २०२०-२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई

महावितरणच्या बिलांबाबत २०२०-२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान सोमवारी दिली.

पनवेल तालुक्यातील महावितरणकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज बिलांसंदर्भात सदस्य प्रशांत ठाकूर व इतर सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, बिल देण्यासाठी मीटरचा फोटो काढला जातो. अचूक बिल देण्यासाठी मीटर वाचन अचूक होणे गरजेचे आहे.

- फेब्रुवारी २०२२ पासून ज्या मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्याचा अहवाल असमाधानकारक होता, अशा ७६ एजन्सींना बडतर्फ केले तर तीन एजन्सींना काळ्या यादीत टाकले.

- पनवेल तालुक्यात मीटरच्या फोटो पडताळणीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये अस्पष्ट फोटोंचे प्रमाण १२ टक्के होते. नोव्हेंबरअखेर ते १.३ टक्के इतके कमी झाले.

- तालुक्यात सरासरी देयकांचे प्रमाणही जुलै महिन्यातील ७.३ टक्क्यांवरून घसरून नोव्हेंबरमध्ये ५.७ टक्के इतके कमी झाले आहे.

- चुकीच्या मीटर वाचन आणि इतर त्रुटींबाबत या विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांना चालू आर्थिक वर्षात ६ लाख ५९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

मीटरचे फोटो तपासणी करताना संपूर्ण राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 

जाने. २०२२    ४५.६% नोव्हें. २०२२    १.९%

बिलिंग तक्रारींची संख्या

२०२० - २१    १०,२२,०००२०२१ - २२    ४,५८,०००१५/१२/२०२२ पर्यंत    २,७२,०००

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :देवेंद्र फडणवीसवीजविधानसभा हिवाळी अधिवेशन