Join us

अजित पवारांनी आज सकाळी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पदाधिकाऱ्याच्या चिठ्ठीची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 8:55 AM

लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मुंबईतील प्रसिद्ध गणपती 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित आहेत. अजित पवार अनेकवेळा सकाळपासूनच राज्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेताना दिसून येतात. त्याचप्रमाणे आज सकाळी त्यांनी सर्वप्रथम लालबागच्या राजाच दर्शन घेतलं.

मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भक्त येत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि व्यक्तींनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते तेव्हा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. अजित पवार हे नियोजित कार्यक्रमामुळे त्यावेळी उपस्थित राहू शकले नव्हते. पंरतु आज मुंबईत आल्यानंतर अजित पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले.

अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी (अजित पवार गट) रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण केली. या चिठ्ठीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. या चिठ्ठीमध्ये ''हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे'', असं लिहिलं होतं. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले होते. अनेकांनी गणपतीच्या देखाव्यातून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत असून, राज्यातील सत्तेची समिकरणं वेळोवेळी बदलत आहेत. अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत भक्कम वाटणारी महाविकास आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता पूर्णपणे कोलमडली आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत.

टॅग्स :लालबागचा राजाअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस