Join us

'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 3:00 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने राज्यात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे. 

'यापुढे...'; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, कानउघडणी करुन थेट बजावले!

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्यावर दगडफेकही केली. तसेच या विनाधप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे. 

'...तर आजपासून माझं नाव छोटा पप्पू, मी स्वीकारतो'; सत्तारांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचं विधान

अब्दुल सत्तार यांच्या या विधानावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू, आम्हीही त्यांच्या विधानाचं समर्थन करत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांचे कान टोचले. तसेच खोके वैगरे म्हणणं देखील चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.  

अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटही अडचणीत आला आहे. अब्दुल सत्तारांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करुन चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. यापुढे अशी वादग्रस्त विधाने करु नका, असंही एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना बजवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. काही कार्यकर्त्यांनी बंगल्यावर दगडफेक करत काच्या फोडल्या आहेत. 

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअब्दुल सत्तारमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे