Join us

उपशहरप्रमुख पाटील,पुत्र व इतर तिघांना अटक

By admin | Published: November 01, 2015 12:13 AM

आपला राजकीय प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता असलेल्या अनिलला संपविण्यासाठी शिवसेनेचा उपशहरप्रमुख अविनाश पाटील याने एक लाखाची सुपारी दिल्याचे उघडकीस

भार्इंदर : आपला राजकीय प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता असलेल्या अनिलला संपविण्यासाठी शिवसेनेचा उपशहरप्रमुख अविनाश पाटील याने एक लाखाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले असून त्याला व त्याच्या मुलासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पाटीलचा निष्ठावंत असलेल्या अनिलला शिवसेनेने उपविभागप्रमुखपद बहाल केले होते. शिवाय परिसरातील साई कॉम्प्लेक्स हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाची माळही त्याच्या गळ्यात घातली होती. यामुळे त्याची लोकप्रियता वाढु लागल्याने त्याला स्थानिकांकडुन मानसन्मान मिळू लागला. ही बाब पाटील याला खटकू लागल्याने त्याने अनिलची उपविभागप्रमुख पदासह हाऊसिंग फेडरेशन अध्यक्षपदावरुन त्याची उचलबांगडी घडवून आणली. यानंतरही अनिलची लोकप्रियता कमी न झाल्याने त्याच्या द्वेषात भर पडू लागली. त्यातच अनिल याला निवडणुकीतील कामकाजाची चांगली माहिती असल्याने तो पुढील निवडणुकीत धोकादायक ठरणार असल्याची भीती त्याला वाटल्याने त्याने मुलगा संदेशसह भिवंडी येथील सारंगगाव, पो. पिंपळास मध्ये राहणारे गोट्या उर्फ नितेश अनिल पाटील व वेताळ रमेश पाटील यांना अनिलला ठार मारण्यासाठी एका पिस्तुलसह एक लाख रूपयांची सुपारी दिली. अनिलवर पाळत ठेवण्यासाठी विशाल चौधरीला नेमून गोळीबार करण्याच्या दोन दिवसापूर्वी गोट्या, वेताळ व विशाल यांनी चव्हाणची रेकी केली होती. २७ आॅक्टोबर रोजी रात्री ८.१५ वा. च्या सुमारास गोट्या व वेताळने अनिलला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार केला.अनिलच्या डोक्यात गोळी लागल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेय््राात कैद झाली होती. काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम व स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय करुंदकर यांच्या पथकाने समांतर तपास करुन वेताळ व गोट्याला भिवंडी येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता वरील प्रकार उजेडात आला असून अनिलवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.