Join us

मुंबईतील रस्त्यावरच्या टपऱ्या हटायला हव्यात; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:23 AM

अजित पवार यांनी मुंबईच्या विकासावर भाष्य करताना युवा लोकप्रतिनिधींना पुढाकार घेण्यासाठी साद घातली. 

"मुंबईतील फुटपाथवरच्या टपऱ्या हटायला हव्यात, शहरात बकालपणा दिसणार यावर काम करायला हवं आणि यात युवा पिढीनं पुढाकार घेऊन काम करावं", असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देऊ केला आहे. ते मुंबईत महापालिकेतील 'हेरीटेज वॉक' कार्यक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. 

राज्याच्या पर्यटन विभागाच्या पुढाकारानं मुंबई महानगर पालिकेची ऐतिहासिक इमारत सर्वसामान्य जनतेला पाहता यावी यासाठी 'हेरीटेज वॉक' या संकल्पनेचा शुभारंभ गुरुवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात संबोधित करताना अजित पवार यांनी मुंबईच्या विकासावर भाष्य करताना युवा लोकप्रतिनिधींना पुढाकार घेण्यासाठी साद घातली. 

"मुंबईचं नाव जगात घेतलं जात. पण फुटपाथवर कुठंही कुणीही बसलंय, अनधिकृत बांधकाम करतंय, टपऱ्या सुरू करतंय हे बंद व्हायला हवं. सुदैवाने मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. आपल्याला कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करुन शहर स्वच्छ कसं राहील याबाबत प्रयत्न करायला हवेत. याबाबत माझं युवामंत्री आदित्य ठाकरेंना सांगणं आहे की यावर पुढाकार घेऊन काम करावं", असं अजित पवार म्हणाले. "एकदम मुंबईचा चेहरामोहरा पटकन बदलता येणार नाही. पण एक एक पाऊल टाकत जर आपण पुढे गेलो तर नक्कीच चांगलं काम होईल आणि ते सर्व मुंबईकरांनाही आवडेल. यासाठी युवा पिढीनं पुढाकार घ्यावा. त्याला आम्ही नक्की पाठिंबा देऊ", असंही ते पुढे म्हणाले. 

शेवटी लेकाने मुख्यालयात आणले : अजित पवार१९९० पासून विधिमंडळात आहोत, मात्र कधी पालिका मुख्यालयात येण्याचा योग्य आला नाही. शेवटी लेकाने इमारतीत आणले, अशा शब्दात अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच हेरिटेज वॉकला मराठी नाव शोधावे, असेही पालिकेला सांगितले.  

टॅग्स :अजित पवारआदित्य ठाकरेमुंबईशिवसेना