लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सभागृहात जे मास्क वापरणार नसतील त्यांना बाहेर काढा, कोरोनाचे संकट असताना आपलेच लोक असे निष्काळजी वागत आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सभागृहात संताप व्यक्त केला. त्यांच्या संतापानंतर बहुतेक सर्वच सदस्यांनी मास्क घातले.
सर्वपक्षीय आमदारांबाबत अजित पवार यांनी नाराजी बोलून दाखविली. ते म्हणाले की, काही जणांचा अपवाद सोडला तर अधिवेशन सुरू झाल्यापासून मी पाहतोय कोणीही मास्क लावत नाही. देशाचे पंतप्रधान हे कोरोनासंदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.
ही बाब गांभीर्याने घ्या
येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्व सदस्यांना मास्क वापराची विनंती करत ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
...अन् मास्कचा वापर सुरु झाला
एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा, असेही त्यांनी सुचविले. त्यांच्या भावनांचा आदर करत अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.