राज्यात पोलीस बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंगचे पुरावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिले आणि सीबीसीआय चौकशी मागणी केली. फोन टॅपिंगच्या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. "राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांच्या परवानगीनंतरच फोन टॅपिंग करता येतं. याबाबतची परवानगी देण्यात आली होती का? यावरचा सविस्तर अहवाल तत्कालिन गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आणि सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे लवकरच देणार आहेत. त्यानंतर सत्य लवकरच समोर येईल", अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फोन टॅपिंगच्या पुराव्या संदर्भात अजित पवार यांना विचारण्यात आलं. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या महत्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत", असं अजित पवार म्हणाले.
सीताराम कुंटे यांच्याकडून गुरवारी संध्याकाळपर्यंत सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालिन आयुक्त असताना राज्यातील काही अधिकारी आणि नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यावेळ सीताराम कुंटे हे राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. हाच धागा पकडून अजित पवार यांनी शुक्ला यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
"सीताराम कुंटे हे त्यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर होते. ते एक साधेसरळ आणि कामात चोख असणारे अधिकारी आहेत याची कल्पना आपणा सर्वांना आहेच. राज्यावर काही दहशतवादी कारवाईचं संकट किंवा त्यांसदर्भातील काही घटना घडण्याचे धागेदोरे असताना राज्याच्या गृह विभागाकडून परवानगी घेऊन फोन टॅपिंग करता येऊ शकते. त्यामुळे याप्रकरणात फोन टॅपिंग करण्याआधी सीताराम कुंटे यांची परवानगी घेणं आवश्यक होते. यासंदर्भातील अहवाल आता सीताराम कुंटे यांना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तो लवकरच सर्वांसमोर येईल", असं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं का? अजित पवार म्हणाले...शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्ष होण्याच्या मागणीबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांन याबाबत मी बोलणार नाही, असं मत व्यक्त केलं. "शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं का? यावर मी बोलणार नाही. कारण केंद्राच्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. राज्यातील विषयावर मी बोलतो. केंद्रीय विषयांवर बोलण्यासाठी आमचे इतर नेते आहेत. ते बोलतील. याशिवाय सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि स्वत: शरद पवार बोलतील", असं अजित पवार म्हणाले.
महाविकास आघडीकडे पूर्ण बहुमत"विरोधकांनी कितीही खोटे आरोप आणि आरडाओरड केली तरी राज्य सरकार हे नियमानुसारच चालत आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीचा प्रश्नच येत नाही", असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.