Join us

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 1:34 PM

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिकिया दिली आहे.

मुंबई- महाविकास आघाडीमधील कुरबुरी कायम आहेत. एका बाजूला काँग्रेसचे २५ आमदार नाराज असताना आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेना अतिशय आक्रमकपणे अंगावर घेत असताना राष्ट्रवादीनं नरमाईची भूमिका घेतल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. 

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिकिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. आम्ही एकटे काम करत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींनी मिळून ही महाविकास आघाडी तयार केली आहे. त्याबद्दल सर्व मिळून निर्णय घेतील. काम करताना एकमेकाला मदत कशी होईल हाच प्रयत्न असतो, असं अजित पवारांनी सांगितलं. 

भाजपाविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपाशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,' असं शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यानं एक्स्प्रेसला सांगितलं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीशरद पवारांना सांगितलं आहे. मविआनं आक्रमकपणे भाजपचा सामना करावा असं खुद्द शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील, अशी आशा सेना नेत्यानं व्यक्त केली.

दरम्यान, भाजपा आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं मविआच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असताना पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित काम होताना दिसत नसल्याचं शिवसेनेतील सुत्रांनी सांगितलं. तर आम्ही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पण शिवसेनेच्या काही नेत्यांना राष्ट्रवादीनं आणखी आक्रमक व्हावं असं वाटतं. कारण गृह मंत्रालय आमच्याकडे आहे, असं राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेअजित पवारमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार