काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये जाताच चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांची खासदारपदी वर्णीही लागली. तसेच शनिवारी आगामी लोकसभेसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली. यामध्ये कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून उमेदवारी दिली आहे. यावरुनच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह भ्रष्टाचारी होते की नव्हते, भाजपाने स्पष्ट करावं, असं आव्हान देखील सुप्रिया सुळेंनी दिलं. तसेच या दोघांवर आधी आरोप केले आणि नंतर त्यांना भाजपा पक्षात प्रवेश दिला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अडचण आली की, भाजपाचं शरद पवारांवर खापर फोडते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी घणाघात केला आहे. भष्ट्राचाराचे आरोप आम्ही सत्तेत आल्यावरच होतात, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला. 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.
राजकारणात एखाद्याने वेगळा निर्णय घेतला म्हणून ती व्यक्ती शत्रू होत नाही. आमच्यासोबत आले ते चांगले आणि त्यांच्याबरोबर गेले ते वाईट असं होत नाही. बदल्याचं राजकारण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी फक्त माझ्या आईला घाबरते, बाकी कोणालाच घाबरत नाही. सगळ्यांनाच आयुष्यात आव्हानात्मक प्रसंग येत असतात. माझ्यासाठी अजित पवारांनी अर्थातच कष्ट केले आहेत. जसं अजित पवारांनी कष्ट केले, तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी कष्ट केले. माझ्याकडून कुटुंब तुटलेलं नाही. अजित पवारांना हवी ती सगळी पदं दिली. आता अजित पवारांनी वेगळी विचारधारा मान्य केली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. राज्यातील गृह विभाग कमकुवत झाला आहे. 'अबकी बार गोळीबार'सारखी परिस्थिती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. माझा लोकशाहीवर विश्वास आहे. कुठलंच सरकार सगळंच वाईट करत नाही, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आणि महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. भाजपाचे खासदार माझ्या इमानदारीचं कौतुक करतात, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.