Join us

“ब्रह्मदेव आला तरी ५ वर्षांत या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही”; अजित पवारांना ठाम विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:33 IST

Deputy CM Ajit Pawar News: आमच्याकडे या मुख्यमंत्री करू म्हणतात. पण तुमच्याकडेच माणसे नाहीत. तुमच्याकडे १५-२० टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणता, असे सांगत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.

Deputy CM Ajit Pawar News: आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. तर पुढील पाच वर्षांचा विचार करून तयार केला आहे. या ५ वर्षांत कुणी गमतीने जरी म्हटले की, अमक्या-तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो. तरी ते काही शक्य नाही. तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार? १० ते २० टाळकी असताना हे आम्हाला पाठिंबा देणार का, अशा खोचक शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत टोलेबाजी केली. 

अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी अनेक मुद्द्यांवर अजित पवार यांनी विरोधकांवर पलटवार केला. चर्चेला उत्तर देताना अजित पवारांनी आमदारांना टाळकी हा शब्द वापरला. याला ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत टाळकी म्हणू नका, असे म्हटले. त्यावरही अजित पवार म्हणाले की, मी आमदारांना नेहमीच सन्माननीय सदस्य म्हणत असतो. पण विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर ही प्रतिक्रिया होती. पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

माझी हात जोडून विनंती आहे, असा गैरसमज पसरवू नका

कोरोना काळात आपण काही योजना सवलती सुरू केल्या. त्या कोरोना संपल्यावर बंद कराव्या लागल्या. काही वेळा केंद्र शासनाकडून राज्याकडील योजनेप्रमाणेच लाभ देणारी नवीन योजना येते. डबल योजना नको म्हणून आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून आपली योजना आपण बंद करतो. यात काहीच चुकीचे नाही. यापूर्वीही हे अनेकदा झालेले आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, असा गैरसमज पसरवू नका, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या काही योजना बंद केल्याचे प्रसारमाध्यमे दाखवत होती. सभागृहात काही सन्माननीय सदस्यांनी याचा उल्लेख केला. मला तुम्हाला सांगायचे आहे की, काही योजना या त्या-त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरू केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात, असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांना प्रश्न विचारायचा होता. अजित पवार यांनी या योजनेचे नाव घेतले नसले तरी महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचे सांगितले.

 

टॅग्स :अजित पवारविधान भवनविधानसभाअर्थसंकल्पीय अधिवेशनमहाराष्ट्र बजेट 2025