मुंबई: देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
रामदेव बाबांनी कोरोनावर लाँच केलेल्या औषधावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनीच घ्यावं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
रामदेव बाबा औषध लाँच केल्यानंतर म्हणाले की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS) जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.
योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले आहे. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा.
कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा - सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते असं बाळकृष्ण यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.