मुंबई- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३चा अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सभागृहात उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी मुंबईतील काही ठिकाणे जलमार्गाने जोडण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते व रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, मीठबंदर ( ठाणे ) व बेलापूर ही ठिकाणे जलमार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सदर ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा तसेच खाडीचे खोलीकरण करण्याची योजना आहे, याकरीता ३३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भाऊचा धक्का ते बेलापूर जलसेवा सुरु झाली असून या सेवेचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असावेत, असं अजित पवारांनी सांगितलं.
रस्ते, मेट्रो, बंदरविकास, विमानतळ विकास अशा विविध दळणवळणाच्या साधनांचा दर्जात्मक विकास, गृहनिर्माण क्षेत्रातील उदि्दष्टपूर्ती करण्याला या अर्थसंकल्पाने प्राधान्य दिले आहे. एसटी महामंडळाला ३ हजार नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी तसेच १०३ बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. मुंबई महानगरप्रदेशातील वाहतूक ताण कमी करण्यासाठी नवीन जलमार्गांची निश्चिती करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बुस्टर डोस मिळाल्याचे सांगतांना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करत असल्याचेही म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका-
राज्य सरकारचं बजेट कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटला कोणत्याही प्रकारची दिशा नाही. मागील बजेटमधील आणि चालू असलेल्या कामाच्याच घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या आहेत. आमच्याच योजनांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
समृद्ध महामार्गासह बुलेट ट्रेनला विरोध करणारं सरकार आता त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करत आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यातही हे सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.