मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षाच्या वतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यकर्मात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांना "हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा", अशा खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.
शरद पवारांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम बराच लांबल्याने अजित पवार यांनी अगदी छोटेखानी भाषण केलं. "देशाच्या हितासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत झटत राहणारा शरद पवार यांच्यासारखा नेता या शतकात तरी कुणी होईल असं वाटत नाही. राजकारण, समाजकारण, शेतकऱ्यांसाठी तळमळ आणि सर्वांकरता आपुलकीनं काम करणारं नेतृत्व आपल्याला लाभलं हा आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे", असं अजित पवार म्हणाले.
"करोनाचं सावट असतानाही आजचा हा आनंदाचा क्षण आपल्याला एकत्रपणे व्यतित करता आला यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. राज्याच्या १३ कोटी जनतेकडून राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो", असंही ते पुढे म्हणाले.