Devendra Fadnavis: टाटा एअरबस, सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसे गेले? देवेंद्र फडणवीसांनी पुरावेच दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:41 PM2022-10-31T16:41:32+5:302022-10-31T16:42:05+5:30
Devendra Fadnavis: २०२१ मध्येच टाटा एअरबस आणि सॅफ्रन पकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्र्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते जसे जसे महाराष्ट्राची बदनामी करतील, तसे मी त्यांना उघडे पाडेन, असे ठणकावून सांगत टाटा एअरबस प्रकल्प तसेच सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसे गेले, याबाबत सविस्तर माहिती देत, यासाठी महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले.
काही नेते, पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.माझा प्रश्न आहे, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला, त्यांना गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार? त्यावेळी कोणी बोलले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी काही त्रुटी घालवाव्या लागतील, सवलती द्याव्या लागतील, आम्ही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र पुन्हा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या काळातच टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला
टाटा एअरबस प्रकल्प २०२१ मध्ये गुजरातमध्ये नियोजित झाला, पण खापर आमच्यावर फोडले जात आहे. विरोधी पक्षनेता असताना मी स्वतः टाटांशी संबंधित व्यक्तींना माझ्या घरी बोलाविले. पण त्यांनी सांगितले की, त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण उचित नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. तरी मी MIDC ला कळविले की तुम्ही पाठपुरावा करा. हा प्रकल्प गेल्यावर सुद्धा मी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, आम्ही एक वर्षापूर्वीच गुजरातचा निर्णय उद्धव ठाकरे यांना कळविला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, सॅफ्रनच्या बाबतीत तर कहरच झाला. जी फॅक्टरी २०२१ मध्ये हैदराबादेत तयार झाली, तो प्रकल्प या आठवड्यात कसा जाऊ शकतो? फेक नरेटिव्हचा तर हा कहर झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याशिवाय वेंदाता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, हे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलले होते, असे सांगत, हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"