महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:46 PM2022-09-24T14:46:19+5:302022-09-24T16:01:37+5:30
पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणेपोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने पीएफआयच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या व्हिडीओविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करु, घोषणा देणार जिकडे असतील, तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अगर नापाक इरादों से ‘पाकिस्तान ज़िंदाबाद’ के नारे लग रहे होंगे तो हम छोड़ेंगे नहीं, कार्रवाई होगी!#pune#Maharashtra#PFI#police#actionpic.twitter.com/G5HOX4uNKq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2022
दरम्यान, एनआयए आणि अन्य केंद्रीय यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करत पीएफआय या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईमागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती. तसंच एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतपूर्ण पद्धतीनं पार पाडण्यात आलं. कोणत्याही हिंसक कारवाईची गरज पडली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात आणखी काही टेरर ग्रूप्स सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली जाणार आहे.
PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी #PFIpic.twitter.com/VTpoePmJsT
— Lokmat (@lokmat) September 24, 2022