Join us

'ज्याचा कुणी नाही, त्याचे आनंद दिघे साहेब होते'; एकनाथ शिंदेंचही फडणवीसांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 12:31 PM

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. एकनाथ शिंदे हे जनतेचे सेवेकरी आहे. कुशल संघटक आहे. एकनाथ शिंदे जनतेसाठी २४ तास काम करणारा नेता आहे. एकनाथ शिंदेंनी फिल्डवर जाऊन समृद्धी महामार्गाच्या समस्या सोडवल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचंही कौतुक केलं. धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा दिली, प्रेम दिलं आणि स्वत:च्या घरापेक्षाही समाजाचा विचार करायला हवा, ही भावना रुजवली. ज्याचा कुणी नाही, त्याचे आनंद दिघे साहेब होते. त्यामुळे आनंद दिघेंच्या याच शिकवणीमुळे एकनाथ शिंदे काम करताना दिसतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, एखादा साधा कार्यकर्ता, शाखाप्रमुख असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी सांभाळली. आनंद दीघेंनी १९८४ मध्ये आनंद दीघे यांनी शिंदेंची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य माणसाला न्याय देण्याकरत ते आंदोलन करायचे, असंही देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदनपर प्रस्तावात म्हटलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकार