मुंबई : मराठी तरुणांची माथी भडकविण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने नियोजनबद्ध मोहीमच हाती घेतली असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईभर ‘जागर मुंबईचा’ यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
यात्रेत मुंबईकरांना गृहीत धरून आजवर होत आलेले राजकारण, विकासाचा बट्ट्याबोळ यांचा पर्दाफाश केला जाईल. नोव्हेंबरमध्ये यात्रेचा प्रारंभ होईल. फडणवीस हे मुंबईकरांशी संवाद साधतील. मराठी मुस्लीम शिवसेनेत येत असल्याचे दाखवून मुस्लीम मतांची बेगमी ठाकरे करीत आहेत. हिंदुत्वाचा विसर त्यांना पडला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्याने जात, धर्म, मराठी माणूस या नावावर विभाजनाची खेळी उद्धव ठाकरे खेळत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.