Join us

फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 5:59 AM

राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली. 

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दीड तासांच्या या भेटीत राज्यातील सत्तांतर, आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीस यांचे औक्षण करून स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत फडणवीस यांची प्रदीर्घ चर्चा झाली. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसेचे नेतेही यावेळी उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीला राजकीय महत्त्वही आहे. आगामी काळात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांनी या निवडणुका किमान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असेच संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकांत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

मनसे भाजपसोबत युतीसंदर्भात काय भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे. आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातच जाहीर केले होते. दरम्यानच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली.  मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुका, विधान परिषद निवडणुका तसेच शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव या सर्वच वेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. 

शस्त्रक्रियेनंतर सक्रियएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज यांनी पत्राद्वारे दोघांचेही अभिनंदनही केले. मात्र, शस्त्रक्रियेमुळे ते कोणाला भेटू शकत नव्हते. 

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमनसेभाजपा