मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. या अधिवेशनात आज देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्र सरकारने गॅसच्या दरवाढीवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.
पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधानसभा सभागृहाचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. मागील वर्षभरात केंद्र सरकारने गॅस दरात सहा वेळा वाढ केली. व्यावसायिक गॅसचा भाव २११९ वर गेला तर घरगुती सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर गेली आहे. त्यामुळे घरोघरी चुली ही मागणी महाराष्ट्राची जनता करेल, अशी शक्यता जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली.
जयंत पाटील यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले. सभागृहात अजित पवार नाहीयत, म्हणून विरोधी पक्षनेतेपदी मीच कसा परफेक्ट आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तेव्हा कोरोनाचा काळ होता. केंद्र सरकारने दिलासा दिला. इतर राज्यांनी दर कमी केले, पण तुम्ही जनतेला दिलासा दिला नाही. फुटकी कवडी दिली नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही तत्काळ दिलासा दिला, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. तसेच काहीतरी पेपरमध्ये यायला हवं, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यायला हवं, त्यासाठी विरोधकांचा हा खटाटोप सुरु असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी चहापानावरुन विरोधकांवर टीका केली होती. देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, अशी टीका त्यांनी केली होती. यावर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आपली भूमिका मांडली. होय मी देशद्रोही म्हटलं. मात्र मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं. मी माझ्या शब्दांवर आजही कायम आहे. नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणणं गुन्हा असेल तर हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेल, मी एकदा नाही पन्नासवेळा म्हणले, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. देशद्रोही दाऊद इब्राहीमसह अनिस शेख, छोटा शकील, हसिना पारकर यांच्यावर द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र नवाब मलिक यांनी हसिना पारकरकडून जमीन घेतली. तसेच सरदार खानकडून नवाब मलिक यांनी एक गाळा देखील घेतला. २००५ साली सरदार खानला मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झाली.
नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक झाली. यानंतर ईडी, सीबीआयने एनआयए यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांना कोठडी झाली. उच्च न्यायालाय आणि सुप्रीम न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. नवाब मलिकांवर दहशतवादी कलमे देखील लावण्यात आली आहे. त्यांना मी देशद्रोही म्हणालो, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. देशद्रोही दाऊद इब्राहीमसोबत व्यवहार असणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालणाऱ्या आणि राजीनामा न मागणाऱ्या लोकांसोबत चाहा पिणं टळलं असं मी म्हटंल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच अंबादास दानवे तुमचं नवाब मलिक यांना सर्मथन आहे का?, त्यांना द्रेशद्रोही म्हणायचं नाही का?, असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी विचारला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"