मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच अजित पवार यांना पूर्ण बहुमत असताना देखील सरकारमध्ये का सामील करुन घेतलं, याचं उत्तर देखील फडणवीसांनी दिलं आहे.
अजित पवारांच्या आगमनाने आमच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या आहेत. राजकारणात नेहमीच राजकीय ताकद अधिक संघटित करावी लागते, ती वाढवावी लागते. आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, अशा वेळी भाजपा इतर पक्षांनाही सोबत घेईल. अजित पवारसोबत आल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली. एकनाथ शिंदे सोबत आल्यानंतर आमचे सरकार चांगले चालले होते. पण राजकारणात नेहमी राजकीय ताकद वाढत असेल तर त्याला नाकारता येत नाही, असं फडवीसांनी सांगितले.
शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची नैसर्गिक युती आहे. तर अजित पवार आमचे राजकीय साथीदार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. तसेच अजित पवारांनीही आता साथ दिल्यानं आमची ताकद आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आमची आमची राजकीय केमिस्ट्री मजबूत आहे. मात्र आता अजित पवार देखील आमच्यासोबत आल्यानं राजकीय अंकगणितही चांगले झाले आहेत, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोणतेही सरकार चालवणे हे आव्हान असते. एक भागीदार असो, दोन असो किंवा कितीही असो, तरीही आव्हाने आहेत. काहीवेळा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडतात, तर कधी घडत नाहीत. तसेच २०१९मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची कल्पना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची होती, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.