Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील प्रकल्प आणि बाहेर जाणारे प्रकल्प याबाबत चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. आतापर्यंतचे जे प्रकल्प राज्याबाहेर केले आहेत, त्या सर्वांना महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप म्हणजेच रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी देवेंद्र फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. वेदांता फॉक्सकॉनपासून ते सेफ्रॉनपर्यंतचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच कसे राज्याबाहेर गेले, याचे पुरावे देत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
काही झाले तरी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात करणारच
गुंतवणुकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्र करणारच असा ठाम निश्चय व्यक्त करताना, ३ लाख कोटींवर गुंतवणूक तसेच १ लाख लोकांना थेट रोजगार, तर ५ लाख लोकांना इतर रोजगार मिळणारा रिफायनरी प्रकल्प कुणी रोखला, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत
आमचे नवे सरकार आले, त्याला तीनच महिने होत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यासाठी २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या योजनांना मंजुरी दिलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात कुणी यायला तयार नव्हते गुंतवणूक करायला तयार नव्हते. महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक तुमच्या कारभारामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेली. तुम्हाला महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय, अशी विचारणा करत, अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मविआ काळात अनेक प्रकल्प बाहेर जात होते. मात्र, ते रोखण्यासाठी विरोधी बाकांवर असतानाही आम्ही प्रयत्न केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब मंजूर करण्यात आला आहे. यातून २ हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचे आभार मानतो. केंद्राकडून राज्याला आलेली ही मोठी भेट आहे. इतकेच नव्हे तर लवकरच नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला टेक्सटाइलचा मोठा प्रकल्प केंद्र सरकार देणार आहे. अर्थसंकल्पापर्यंत याची घोषणा होईल. किंबहुना आधीच होऊ शकते, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"