Join us

बच्चू कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय!

By मुकेश चव्हाण | Published: March 21, 2023 1:58 PM

सध्या राज्याचं अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

मुंबई: सध्या राज्याचं अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक कामगारांच्या समस्येवरुन सभागृहात प्रश्न उपस्थित केला. 

राज्यभरात दरवर्षी २५ ते ३० टक्के प्रकल्प बाद होतात. मोठे-मोठे प्रकल्प उभे राहतात आणि मग ते काही कारणास्तव बाद होतात. यामुळे कामगार रस्त्यावर येतात. त्यामुळे राज्य सरकारचं काहीतरी धोरण असायला हवं, असा मुद्दा बच्चू कडू यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने याबाबत धोरण आखायला हवं. काही कामगार आपलं घर वैगरे सोडून त्या प्रकल्पासाठी जातात. मात्र तो प्रकल्प दोन वर्षात बंद पडल्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं, असा मुद्दा बच्चू कडू यांनी उपस्थित केला. 

प्रकल्पात गुंतवणूक करताना कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का?, असं धोरण असणं गरजेचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले. आता आमच्यायेथील फिनले मिल देखील बंद झाली. म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं...आता लग्न तुटलं...याला कोण जबाबदार आहे?, याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी, अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली. बच्चू कडू यांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. 

संजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले!

लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आणि तुटलं तर त्याला सांभळण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं हसत-हसत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. तसेच बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर धोरण तयार करता येईल का?, हे आपण नक्की बघू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील काही प्रश्न मांडले. नाशिक जिल्ह्यासह नागपूरमध्ये देखील ॲश पाँड आहेत. त्याठिकाणी ७ ते ८ फुटांचे ॲश पाँड आहेत. आम्ही सरकारमध्ये असताना नांदगावमधील ॲश पाँड साफ करण्याचा प्रयत्न करत होता. पावसाळ्याआधी हे ॲश पाँड क्लिअर करणे गरजेचं असतं, अन्यथा ती सगळी ॲश शेतकऱ्यांच्या शेतात जाईल. त्यामुळे ती ॲश लवकरात लवकर क्लिअर करणार का?, असा माझा प्रश्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ७०० ते ८०० एकरची जमीनीत ॲश पाँड हे नॉन साइटिफिकली बनवले आहेत. तर ते क्लिअर करुन सोलरसाठी हजारो एकर जागा लागत असेल तरी आजूबाजूची जागा आहे, त्याठिकाणी सोलार प्लॅनबाबत विचार करणार आहात का?, जेणेकरुन तेथील स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होईल. अनेक ठिकाणी कोल वॉशरिष अवैधरित्या सुरु होत असल्याचा मुद्दा देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंच्या या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बच्चू कडू यांनी सदर प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला होता का? सरकारने लग्न लावायचं....तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. त्यावर आदित्य ठाकरेही नको, नको म्हणत उठले आणि अध्यक्ष महोदय, लग्न लावून देऊ वैगरे ही काही राजकीय धमकी आहे का?, असा मिश्किलपणे प्रश्न विचारला. यावर सभागृहात एकच हशा पिकला. यावर कोणाचं तोंड कसं बंद करायचं याचा हा उत्तर उपाय आहे. मी अनुभवातूनच बोलतोय, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरेबच्चू कडूमहाराष्ट्र बजेट 2023