Join us

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं हिंदू दिनदर्शिकेचं अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 5:36 PM

मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं मुंबईत हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर हिंदू सणांवरील संकट टळलं, हिंदू सण उत्सव जल्लोषाने साजरे होऊ लागले असा दावा सातत्याने भाजपा करत आहे. त्यात आता हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत भाजपानं हिंदू दिनदर्शिकेचे अनावरण केले आहे. 

मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना संकट टळल्यानंतर प्रथमच हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यात आपल्या सणांचं, उत्सवांचं, हिंदुधर्मातील प्रथा परंपरांचं ज्ञान येणाऱ्या पिढीला कळावे यासाठी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे अनावरण केल्याचं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा नेते विनोद तावडे, आशिष शेलार, पराग अलवानी, खासदार पूनम महाजन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विलेपार्ले विधानसभेत लोकमान्य सेवा संघातर्फे शताब्दी वर्षाअंतर्गत आयोजित हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रेत या दिनदर्शिकेचे उद्धाटन करण्यात आले. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्षणचित्रे आणि प्रत्येक मराठी हिंदू महिन्यातील सणांची माहिती यात विषद करण्यात आली आहे असं भाजपाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीस