Join us  

'अभी नही तो कभी नही, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा'; देवेंद्र फडणवीसांनी दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 4:30 PM

प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई- मुंबईतील गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. 

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण

खरी शिवसेना आपल्यासोबत आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून लढा आणि 'अभी नही तो कभी नही', असे ठरवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसेच आता केवळ एकच लक्ष्य म्हणजे मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन देखील देवेंद्र फडणवीसांनी केलं. यामध्ये प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. 

'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा

उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली, असा गौप्यस्फोटही अमित शाह यांनी केला. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असं अमित शाह यांनी सांगितले. स्वता:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वताच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअमित शाहदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपा